नागपूर: रविवार पासून लागलेली संततधारेची झड आणि मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने कोट्यवधींची उधळपट्टी करीत केलेल्या स्मार्ट सिटीवरचा मेकअप बुधवारी चांगलाच उतरवला. सीमेंट रस्त्यांचे सदोष बांधकाम, पाण्याच्या निचऱ्याची समस्या, अव्यवस्थित विकासकामे, सातत्याने होणारी खोदकामे व नियोजन शुन्य ढिसाळपणामुळे नागपूरकरांना एकाच पावसाने झोडपून काढत शहरातल्या १५० हून अधिक वस्त्या जलमय केल्या. पावसाने वेढलेल्या घरांमध्ये अडकलेल्या १३८ हून अधिक जणांना बोटीने सुरक्षित बाहेर काढावे लागले. शहराच्या परिघातील ४५० हून अधिक घरांमध्ये पडझडीचे अंशीक नुकसान केल्यानंतर गुरुवारी पावसाने विश्रांती दिली. सलग चार दिवसांनंत पावसाने खंड दिल्याने पूरग्रस्त भागांत पाणी ओसरले आहे.












