मुंबई : दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने नुकताच तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी येत्या काही दिवसात या मार्गिकांवरील फेऱ्या वा गाड्या वाढविण्याची गरज लक्षात घेता मुंबई महानर प्रदेश विकास प्राधकिरण (एमएमआरडीए) आणि महा मुंबई मेट्रो संचलन महामंडाळाने (एमएमएमओसीएल) गाड्या वाढविण्याचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार एमएमएमओसीएलने गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दोन अतिरिक्त गाड्या चालवून पाहिल्या. त्यामुळे मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांवरील मेट्रो गाड्यांच्या ताफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांच्या जाळ्यातील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिका पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मार्गिका ठरत आहेत. या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्या तेव्हा त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सुरुवातीला दिवसाला केवळ ३० हजार प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करीत होते. मात्र त्यानंतर या मार्गिकांना प्रतिसाद वाढत गेला आणि आता दिवसाला अडीच लाखांहून अधिक प्रवासी या मार्गिकांवरून प्रवास करीत आहेत.८ जुलैला तर दैनंदिन प्रवासी संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला. ८ जुलैला तीन लाख १ हजार १२७ प्रवाशांनी या मार्गिकेवरून प्रवास केला. २४ जूनला ही संख्या दोन लाख ९७ हजार ६०० अशी होती. या मार्गिकांवरील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी या वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे म्हणत एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएल कामाला लागाल्याची माहिती सूत्रांनी दिली.












