नवी दिल्ली:‘आता ते परत आले आहेत, त्यामुळे त्यांना मणिपूरला भेट देण्यासाठी, पहलगाममधील दहशतवाद्यांना अद्याप शिक्षा का झाली नाही, याचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांच्या गृहराज्यातील पायाभूत सुविधांच्या कोसळलेल्या स्थितीवर विचार करण्यासाठी वेळ मिळू शकेल’, असा टोला गुरुवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. पंतप्रधान संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकही घेऊ शकतात, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी भारतात परतले. या दौऱ्यादरम्यान मोदी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या १७ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेलाही उपस्थित राहिले. पंतप्रधान मोदी भारतात परतल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी त्यांच्यावर टीका केली.












