गुजरातच्या बडोद्यातील गंभीरा पूल कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना ९ जुलै रोजी घडली. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. दरम्यान, या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दरियापुरा गावात शोककळा पसरली आहे. ही घटना घडली तेव्हा हे कुटुंबीय एका कारमधून त्या ठिकाणाहून प्रवास करत होतं. मात्र, अचानक पूल कोसळला आणि या कुटुंबाची कार नदीत पडली. यावेळी गाडीतील सात जणांपैकी दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला.
नाईक रमेश पढियार (२ वर्ष), वेदिका रमेश पडियार (४ वर्ष), रमेश दलपत पडियार (३८ वर्ष), प्रवीण जाधव (३३ वर्ष), राजेश ईश्वर चावडा (२२ वर्ष), वखत मनुसिंह जाधव (५५वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. जेव्हा ही गाडी नदीत पडली तेव्हा त्या गाडीमधील एक महिला कारची खिडकी तोडून बाहेर निघाल्याने बचावली आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना माझ्या मुलींसाठी माझ्याकडे आता काहीच उत्तर नसल्याचं तिने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.
दरम्यान, हे कुटुंब आध्यात्मिक यात्रेसाठी बागडाणा या ठिरणी जात होतं. या दुर्घटनेमुळे तीन मुली अनाथ झाल्या आहेत. याच अपघातात जखमी झालेल्या सोनल पढियार या महिलेने सांगितलं की, “ही घटना घडल्यानंतर जवळपास एक तास कोणतीही मदत मिळाली नाही. आम्ही बागडाणाला जात असताना ही घटना घडली. मी शेजारी पडलेल्या एका ट्रकला धरून बाहेर निघाल्यामुळे मी वाचले. घटनेनंतर एक तासापर्यंत कोणीही मदतीला आलं नाही. माझ्या कुटुंबाचं काय झालं हे मला अजूनही माहित नाही. मी अजूनही कुटुंबातील सदस्यांसाठी प्रार्थना करत आहे”, असं तिने म्हटलं आहे.












