‘ठरलं तर मग’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. त्यामध्ये अभिनेत्री जुई गडकरी व अमित भानुशाली मुख्य भूमिका साकारत आहेत. या दोघांसह मालिकेतील इतर कलाकारांचीसुद्धा प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ आहे. प्रेक्षक अनेकदा सोशल मीडियामार्फतही त्यांना प्रतिसाद देत असतात. अशातच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एक कलाकाराने नुकतेच मालिकेतील सीनमुळे त्याच्यासह घडलेला एक किस्सा सांगितलं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत अनेकदा कोर्ट सीन दाखवले जातात. मुख्य नायक (अर्जुन सुभेदार) मालिकेत स्वत: वकील असल्याने या संदर्भातील गोष्टी अनेकदा प्रेक्षकांना पाहायला मिळतात. अशातच यामध्ये अभिनेते सागर तळाशीकरसुद्धा रविराज किल्लेदार ही वकिलाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे.
सागर तळाशीकर यांनी मालिकेतील सीनमुळे त्यांना खऱ्या आयुष्यातील त्यांच्या एका वकील मित्राचा फोन आल्याचं सांगितलं आहे. सागर तळाशीकर यांनी अभिनयाव्यतिरिक्त वकिलीचं शिक्षणसुद्धा घेतलं असल्याचं मुलाखतीमधून सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांना “मालिकेत सीन करताना कधी तुमच्यातील वकील जागा होतो का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.












