नागपूर : उपराजधानीचे शहर नागपुरात गुन्हेगारीचा विळखा घट्ट होत आहे. दिवसाढवळ्या हाणामाऱ्या, खंडणी, चाकू हल्ले, पैशांसाठी धमक्या, व्याजबट्टी, जमीनीवरचे कब्जे, त्यातून होणारे वाद, गँगवॉर रोजच्या घटना झाल्या आहेत. पोलीस आयुक्तालयानेच दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यातच शहरात ५० खून झाले. आपसांतल्या वादानंतर प्राणघातक हल्ल्याच्या ९० हून अधिक घटन घडल्या. इतक्यावरच शहरातली गुन्हेगारी थांबलेली नाही. पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात सहा महिन्यांत ३२० गुन्हेगारांकडून ३० ते ३५ बंदुका आणि तलवारी जप्त झाल्या आहेत. चालूवर्षात आतापर्यंत अपहरणाच्या २०५ घटनांची नोंद पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे जे घडते, ते निमूटपणे सहन करीत खाली मान घालून दहशतीत जगणाची वेळ सामान्य माणसावर आली आहे.












