मध्यप्रदेशमध्ये पोलीस विभागाच्या दुर्लक्षाचे आणि व्यवस्थेच्या अपयशाचे एक अनोखे उदाहरण पाहायला मिळाले आहे. राज्यातील विदिशा जिल्ह्यातील एक पोलीस कॉन्टेबलने तब्बल १२ वर्षांमध्ये एकही दिवस कामावर न येता तब्बल २५ लाख रुपयांचा पगार उचलल्याची बाब समोर आली आहे . या धक्कादायक प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कॉन्स्टेबल २०११ मध्ये मध्य प्रदेश पोलिसात भरती झाला आणि नोकरीच्या सुरूवातीला त्याची नियुक्ती भोपाळ पोलिस लाईन्समध्ये झाली. रुजू झाल्यानंतर काही दिवसातच त्याला बेसिक पोलीस प्रशिक्षणासाठी सागर पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे पाठवण्यात आले. पण तेथे जाण्याएवजी तो गुपचूप विदिशा येथील घरी निघून गेला, असे सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) अंकिता खाटेरकर यांनी सांगितले.
वरिष्ठांना न कळवता किंवा रजा न घेत या कॉन्स्टेबलने त्याचे सर्व्हिस रेकॉर्ड परत भोपाळ पोलीस लाईन्स येथे स्पीड पोस्टाने पाठवून दिले. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष उपस्थिती किंवा त्याच्या प्रशिक्षणाची स्थिती असे कोणतेही व्हेरिफिकेशन न करता ती स्वीकारण्यात देखील आली, असे एसपींनी सांगितले.
प्रशिक्षण केंद्रातील कोणीही त्याच्या गैरहजेरीची नोंद घेतली नाही आणि भोपाळ पोलीस लाईन्समधील कोणीही यावर शंका उपस्थित केली नाही.
अशाच पद्धतीने एकामागून एक महिने आणि नंतर वर्षे उलटत गेली, पण त्यानंतर हा कॉन्स्टेबल कधीच ड्युटीवर हजर झाला नाही. तरीही त्याचे नाव यादीत कायम राहिले आणि त्याचा मासिक पगार न चुकता जमा होत राहिला. काळ उलटला आणि त्याने एकदाही पोलिस स्टेशन किंवा प्रशिक्षण मैदानात पाऊलही न ठेवता २८ लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळवली.
अखेर असा झाला उलगडा
अखेर २०२३ मध्ये जेव्हा विभागाकडून २०११ च्या बॅचचे मूल्यमापन केले जात होते तेव्हा हा प्रकार अचानक उजेडात आला. अधिकाऱ्यांना हा कॉनस्टेबल कुठेच सापडेना, इतकेच नाही तर विभागातील कोणालाच त्याचे नाव किंवा चेहरा आठवेना. अंतर्गत चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले पण त्यांना काहीही सापडले नाही.
अखेर जेव्हा कॉन्स्टेबलला चौकशीसाठी बोलवण्यात आले तेव्हा त्याने दावा केला ही त्याला मानसिक आजार झाला होता असे एसीपी खातेरकर यांनी सांगितले. त्याचा दावा खरा असल्याचे दाखवण्यासाठी त्याने कागदपत्रे देखील सादर केली, त्याच्या आजारपणामुळे त्याला इतक्या वर्षात कामावर परत येता आले नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर, हे प्रकरण भोपाळच्या टीटी नगर भागात तैनात असलेले एसीपी खातेरकर यांच्याकडे चौकशीसाठी सोपवण्यात आले.
दरम्यान आतापर्यंत या कॉन्स्टेबलने पोलीस विभागाला १.५ लाख रुपये परत केले आहेत आणि उर्वरित रक्कम त्याच्या भविष्यातील पगारातून कपात करून परत करण्याचे मान्य केले आहे. हा कॉन्स्टेबल सध्या भोपाळ पोलिस लाईन्समध्ये तैनात आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे, असे एसीपींने सांगितले.
अधिकार्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे आणि आणखी जबाब घेतले जातील. तसेच वरिष्ठांच्या सूचनांनुसार दुर्लक्ष करणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई देखील होईल असेही सांगण्यात आले.












