ठाणे : वरळी येथे राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच मंचावर मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे बंधूंचे बॅनर उभारण्यात आले आहे. या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र आहे. तर खालील भागात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांचे छायाचित्र आहे.
एतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा ‘चला वरळी’ असे यात म्हटले आहे. तसेच ही तर सुरवात आहे, अनेक गोष्टींचा शेवट करण्यासाठी असेही म्हटले आहे. त्यामुळे हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून अनेक वर्षांपासून निवडून येतात. या मतदारसंघातील वागळे भागातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मराठी विजयी मेळावा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये या मेळाव्याची तयारी सुरु झाली होती.
शुक्रवारी रात्रीपासूनच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात जमून आजच्या तयारीचा कार्यक्रम आखला होता. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ हा संमिश्र वस्तीचा मतदार संघ आहे. या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बॅनर उभारले आहेत. या बॅनरवर ‘ही तर सुरुवात आहे, अनेक गोष्टींचा शेवट करण्यासाठी’ असे या बॅनरवर म्हटले आहे. एतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, चला वरळी असा उल्लेख यात आहे.












