सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषा वादावरून वांदग सुरू आहे. अशातच एका व्यावसायिकाने या भाषा वादात उडी घेतली. मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे सांगितले की, ‘मी मराठी भाषा शिकणार नाही’. त्यात पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली. त्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी-हिंदी भाषेच्या या वादंगात अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. अशातच आता मराठी अभिनेता अक्षय केळकरनेही याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने या पोस्टमधून ‘तुम्ही ज्या राज्यात वास्तव्यास आहात, त्या राज्याची भाषा बोलण्याची अपेक्षा करण्यात चूक कशी असू शकते’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच ‘ते येत नसल्यास सौजन्यपूर्वक मान्य करावे’ असं मतही त्याने व्यक्त केलं आहे.
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये अक्षय असं म्हणतो, “माझ्या आजुबाजूला आणि माझ्या व्यवसायात असे माझे अनेक मित्र-मैत्रिणी आणि परिचित लोक आहेत, जे जन्माने अमराठी आहेत. केवळ चार ते पाच वर्षांपासून ते महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करत आहेत. परंतू ते खूप छान मराठी बोलतात. त्याचबरोबर अशीही काही माणसे आहेत, ज्यांना बरीच वर्ष इथे राहूनही संपूर्ण शुद्ध मराठी शिकायला जमत नाहीये, तरीही तोडकी मोडकी का असेना, पण मराठीत बोलायचा प्रयत्न करतात.”












