भारताचे उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानसह चीन, तुर्कियेचाही सामना केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने निर्णायक यश मिळविल्यानंतर आता महिन्याभराने उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी शुक्रवारी याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या पाठिशी चीन आणि तुर्कियेचा हात असल्याचे म्हटले. दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना राहुल सिंह म्हणाले, “पश्चिम भारताच्या सीमेवर भारत एका शत्रूशी लढत होता. मात्र वास्तवात भारत तीन शत्रूंना तोंड देत होता. आपल्यासमोर सीमेवर पाकिस्तान होता. मात्र चीनकडून त्यांना मदत दिली जात होती.”
लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांच्या भाषणाचा व्हिडीओ पीटीआयने शेअर केला आहे. ते म्हणाले, चीनकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत दिली जात होती. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण मागच्या पचा वर्षात पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांवर नजर टाकली तर त्यातील ८१ टक्के चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आहेत.
लेफ्टनंट जनरल राहुल सिंह पुढे म्हणाले, भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली. चीनसाठी भारत-पाकिस्तान संघर्ष एका प्रयोगशाळेतील प्रयोगासारखा होता.












