ठाणे : उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून ताशेरे ओढल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली असून यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांच्या पाहाणीत आढळून आलेली १२४ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. शीळ येथील १८ अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या आहेत तर, याच भागातील आणखी तीन बेकायदा इमारती रिकाम्या करून पाडण्याची कारवाई पालिकेमार्फत सुरू आहे.
मुंब्रा येथील शीळ भागातील १७ बेकायदा इमारतींचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनाला फटकारले. तसेच शहरातील ना विकास क्षेत्र आणि हरित क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवरही तातडीने कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १७ बेकायदा इमारतींवर कारवाई सुरू केली होती.
या कारवाईदरम्यान, येथे आणखी चार बेकायदा इमारती आढळून आल्या होत्या. त्यांच्यावरही पालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर त्यांनी संपुर्ण शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात विशेष मोहिम हाती घेतली असून त्यासाठी प्रभाग समितीनिहाय उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथके नेमली आहेत. या पथकांमार्फत १९ जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे.












