ठाणे : येथील कोलशेत भागातील वायु सेनेच्या स्थानकाजवळील अकबर कॅम्प परिसरातील रस्त्यावर फेरिवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून त्याचबरोबर या गाड्यांवरील ज्वालाग्राही उपकरणांमुळे स्फोट होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या संदर्भात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता कोलशेत रस्त्यावरील डि-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायु सेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरिवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा रस्ता फेरिवालामुक्त होण्याची चिन्हे आहेत.
घोडबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून ओळखले जाते. या मार्गावरून अनेक नागरिक प्रवास करतात. काही वर्षांपुर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. घोडबंदरच्या मुख्य मार्गावर कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी अनेकजण कोलशेत मार्गेच प्रवास करीत आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर फेरिवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.












