ऑपरेशन सिंदूरनंतर, भारत सातत्याने पश्चिम सीमेवर आपली लष्करी ताकद आणि लढाऊ क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत असताना, अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरच्या पहिल्या तुकडीची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. १५ महिन्यांहून अधिक विलंबानंतर, पश्चिम सीमेवर तैनात करण्यात येणाऱ्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने मार्च २०२४ मध्ये जोधपूरमध्ये पहिले अपाचे स्क्वाड्रन उभारले होते, परंतु उभारणीच्या जवळजवळ १५ महिन्यांनंतरही, स्क्वाड्रन अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरशिवाय आहे.
अमेरिकेकडून अपाचे एएच-६४ई लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. २०२० मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या ६०० दशलक्ष डॉलर्सच्या कराराचा भाग म्हणून, भारतीय लष्कराला मे-जून २०२४ पर्यंत सहा अपाचे हेलिकॉप्टरची डिलिव्हरी अपेक्षित होती. पण, पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यामुळे ही डिलिव्हरी डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
याबाबतची माहिती असलेल्या सूत्रांनी असे सांगितले की, या हेलिकॉप्टरची पहिली तुकडी या महिन्यापर्यंत भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सला सुपूर्त केली जाऊ शकते. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.












