विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला!, विठ्ठल, विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, हे आणि असे अनेक अभंग गात, माऊली-माऊलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढ महिन्यात पंढरीची वारी करतात. पंढरीची ही वारी साधारण २५० किमीची असते. या वारीची परंपरा महाराष्ट्रात कधी सुरु झाली, वारीचा मार्ग कुठला? या सगळ्याची माहिती आपण जाणून घेऊ.
वारी म्हणजे नेमकं काय?
वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. पंढरीच्या वारीला न चुकता जाण्याची ही परंपरा आहे.
वारकरी हा शब्द कसा तयार झाला?
आपल्याकडे आठवड्यातले जे वार आहेत त्यांना आपण सोमवार, मंगळवार, बुधवार असं म्हणतो, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाणं याला वारी म्हटलं जातं. वारकरी या शब्दाचा अर्थच मुळात वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं. या संप्रदायचा मुख्य आचार संदर्भ म्हणजे वारी करणे. बाप रखुमादेवी विठ्ठलाचा वारेकरु ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे. ती शब्दार्थाच्या पलिकडे जाणारी आहे. इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी हा सगळा इतिहास उलगडला आहे.
विठ्ठल नेमका कोण आहे?
१३ व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबाकाका, जनाबाई हे सगळे होते. १३ वं शतक म्हणजे संतांची मांदियाळी असं मानलं जातं. तेराव्या शतकातल्या सगळ्या संतांनी विठ्ठलाचा, पंढरपूरचा आणि वारकऱ्यांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात केला आहे. यादवांचं राज्य जेव्हा होतं त्यातही वारीचे उल्लेख आहे. १३ व्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित असा संप्रदाय महाराष्ट्रात होता यात काही शंकाच नाही. वारी नेमकी कधी सुरु झाली ते सांगता येत नाही. पण १३ व्या शतकात वारीचे उल्लेख आहेत. शंकराचार्यांनी पांडुरंगांचं स्त्रोत्र रचलं होतं. त्यांचा काळ हा आठव्या शतकापासूनचा आहे. त्यामुळे पांडुरंगाचे संदर्भ हे आठव्या शतकापासून आपल्याकडे आहेत यात काही शंकाच नाही. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण. पुंडलिकाची गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. श्रीकृष्ण द्वारकेहून पुंडलिकासाठी आला. त्यामुळे विटेवर पुंडलिकाने त्याला उभं केलं. विठ्ठल म्हणजेच कृष्ण मूर्तीरुपाने उभं केलं. त्यामुळे विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण. वारकरी संप्रदाय म्हणजे कृष्णसंप्रदायही आहे. भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय असं आपण त्यांना म्हणू शकतो, पण कृष्ण संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय बरेच आहेत पण वारकरी ही फक्त महाराष्ट्राची खासियत आहे. वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर, नामदेव यांच्याही आधीपासून सुरु झाली अशी माहिती सदानंद मोरेंनी दिली.
महाराष्ट्रातून किती पालख्या पंढरीच्या दिशेने निघतात?
महाराष्ट्रात २०० ते २५० पालख्या पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहेत. पालख्यांबरोबर चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात.












