लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये भांडणानंतर टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची अनेक प्रकरणे घडलेली आहेत. नुकतेच भोपाळमध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे आता खळबळ उडाली आहे. भोपाळच्या गायत्री नगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय सचिन राजपूतने त्याची प्रेयसी रितीका सेनचा (वय २९) खून केला. यानंतर तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवत मृतदेहाशेजारीच दोन रात्री घालवल्या. जसे काहीच घडले नाही, असे दाखवत सचिन राजपूत त्याच घरात राहिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जूनच्या रात्री सचिन आणि रितीका यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. सचिन बेरोजगार आहे, तर रितीका एका खासगी कंपनीत काम करते. यावरून सचिनच्या मनात रितीकाबद्दल असूया निर्माण झाली होती. तसेच रितीकाचं तिच्या वरिष्ठासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय सचिनला वाटत होता. याच कारणावरून दोघांचं भांडण झालं, ज्यात रितीकाचा खून झाला.












