तेलंगणात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेलंगणाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आमदार टी राजा सिंह यांनी भाजपाचा राजीनामा का दिला? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आमदार टी राजा सिंह यांनी आज तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांना एक पत्र लिहिलं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणाच्या राज्याच्या नेतृत्वासाठी सुरु असलेल्या संघर्षावरून टी राजा सिंह हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
टी राजा सिंह यांनी एक पत्र लिहिलं असून त्या पत्रात त्यांनी म्हटलं की, रामचंद्र राव यांची भाजपाप्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय हा त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. याबाबत टी राजा सिंह यांनी नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांच्याकडे पाठवला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.












