मुंबई : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर, कोकण, घाटमाथ्यावर आणि विदर्भात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, कोकणासह घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथ्यावर दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी ठराविक भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे काही भागात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. तर, कोकण, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज रत्नागिरीबरोबरच पुणे आणि सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली , जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस आधीच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे.












