भारतीय रेल्वेने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधीच आरक्षण चार्ट तयार करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रस्तावानुसार रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी सीट रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
भारतीय रेल्वेने रविवारी जाहीर केलं की आधीच्या ४ तासांच्या पद्धतीऐवजी यापुढे रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधीच आरक्षण चार्ट तयार करण्यात येईल. प्रवाशांना विशेषतः प्रतीक्षा यादीतील तिकिट असलेल्या प्रवाशांना भेडसावणारी अनिश्चितता कमी करण्याच्या अनुषंगाने भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तिकीट बुकिंग प्रणालीमधील सुधारणा संदर्भातील आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
दरम्यान, आता नवीन योजनेनुसार दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजता तयार करण्यात येईल. तसेच कोणत्याही व्यत्ययाशिवाय ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी हा बदल टप्प्याटप्प्याने अंमलात आणला जाणार असल्याचंही भारतीय रेल्वे मंडळाने स्पष्ट केलं आहे. या निर्णयाचा फायदा दुर्गम भागातून किंवा मोठ्या शहरांच्या उपनगरामधून येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. कारण त्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची स्थिती तपासण्यासाठी आणि गरज पडल्यास पर्यायी प्रवास व्यवस्था करण्यासाठी अधिकचा वेळ मिळेल.












