सोलापूर : ‘ऑनलाइन खेळाच्या नावाखाली तरुणाईची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी व्यापक तपास करून २३ आरोपींविरुध्द न्यायालयात सुमारे पाच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या बेकायदा ऑनलाइन खेळातून ३६ कोटी ३३ लाख ६७ हजार ६२८ रुपयांचा बेकायदा व्यवहार झाला असून यात फिर्यादीसह इतर सात तरुणांची दोन कोटी ७८ लाख २६ हजार ७२६ रुपयांची फसवणूक झाल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे.
गेल्या १२ फेब्रुवारी रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. कुर्डूवाडीशिवाय बार्शी व सोलापूर जिल्ह्यात इतर ठिकाणी चालणारे या धंद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ऑनलाइन खेळाच्या बेकायदा धंद्यातून तरुणांना भुरळ पाडून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन महादू पाटमस, रणजित महादेव सुतार, वैभव बाबू सुतार (रा. कुर्डूवाडी) यांच्या विरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता.
नंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला होता.












