पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुंडाकडून स्वारगेट पोलिसांनी पिस्तूल जप्त केले. सारसबाग परिसरात ही कारवाई केली.
नरेश उर्फ नब्या सचिन दिवटे (वय २२, रा. सर्व्हे क्रमांक १३३, दांडेकर पूल) असे् अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दिवटे याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. दिवटे हा कारागृहात होता. कारागृहात असताना त्याने न्यायालयाकडून जामीन मिळविला. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि दिनेश भांदुर्गे हे सारसबाग परिसरात गस्त घालत होते.
त्या वेळी दिवटे हा आदमबागेजवळील रस्त्यावर थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती शिंदे आणि भांदुर्गे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या कंबरेला पिस्तूल खोचल्याचे आढळून आले. दिवटे याच्याकडून पिस्तुलासह एक काडतूस जप्त करण्यात आले. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












