उत्तराखंडमधील भाजपाचे माजी आमदार सुरेश राठोड यांचा दुसऱ्या पत्नीबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने याची दखल घेतली आहे. राठोड यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसऱ्या महिलेबरोबर लग्नगाठ बांधल्याचा आरोप करण्यात येत होता. यानंतर राज्य भाजपाने याची दखल घेतली असून अशोभनीय वर्तन केल्याबद्दल सुरेश राठोड यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने या प्रकरणावर जोरदार टीका केली होती.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये माजी आमदार सुरेश राठोड अभिनेत्री उर्मिला सनावर बरोबर दिसून आले आहेत. ही त्यांची दुसरी पत्नी असल्याचा आरोप करण्यात आला. कालांतराने सुरेश राठोड आणि उर्मिला यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत लग्न झाल्याचे कबूल केले.
उत्तराखंड भाजपाचे माध्यम प्रभारी मनवीर सिंह चौहान यांनी याप्रकरणावर बोलताना सांगितले की, आम्ही सुरेश राठोड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी दिलेल्या उत्तराने पक्षाचे समाधान झाले नाही. माजी आमदार राठोड यांना पक्षाची आचार संहिता आणि सामाजिक मर्यादांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानले गेले आहे. या आधारावर प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांच्या निर्देशानुसार राठोड यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
दरम्यान व्हायरल व्हिडीओवर वाद उद्भवल्यानंतर माजी आमदार सुरेश राठोड यांनी म्हटले की, सदर व्हिडीओ एका चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आहे. त्याचा वास्तवाशी संबंध नाही.
काँग्रेसच्या प्रवक्त्या गरिमा दसौनी यांनी या प्रकरणावरून भाजपावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, राठोड यांच्या प्रकरणामुळे भाजपाचे दुटप्पी आणि अनैतिक राजकारण समोर आले आहे. जर व्हायरल व्हिडीओ हा चित्रपटाचा भाग होता, तर आम्ही हे मानायचे का की, भाजपा नेत्यांचे सार्वजनिक आचरण हे पटकथेचा भाग आहे? आणि जर व्हायरल व्हिडीओ खरा आहे तर पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचा फक्त दिखावा केला आहे.
दरम्यान एक आठवड्यापूर्वी सुरेश राठोड आणि अभिनेत्री उर्मिला यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन लग्न झाल्याचे मान्य केले. आमच्या प्रेमाचा विजय झाला आहे. काही अडचणी असल्यामुळे आम्ही आजवर आमचे नाते उघड केले नव्हते, असेही विधान राठोड यांनी या पत्रकार परिषदेत केले होते.












