पिकनीकसाठी म्हणून गेलेल्या एका पाकिस्तानी कुटुंबावर काळाने घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात शुक्रवारी स्वात नदीत अचानक आलेल्या पूरामध्ये (flash flood) वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील १८ पैकी ९ जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
न्यूज१८ ने रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व जण ‘पिकनीक ब्रेकफास्ट’साठी गेले होते आणि पाण्यात उभे राहून फोटो काढत होते. पण यावेळी अचानक पूर आला, असे जिल्हा अधिकारी शेहजाब महबूब यांनी सांगितले.
“ते काही सेल्फी घेण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी तेवढे पाणी नव्हते. अचानक पूराचे पाणी आले आणि लहान मुले वाहून गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता, जणू एखादा बांध फुटला आहे असे वाटत होते,” असे या कुटुंबाच्या नातेवाईकाने रॉयटर्स टीव्हीशी बोलताना सांगितले.












