अहमदाबादमध्ये १२ जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या एआय-१७१ या विमानाचा भीषण अपघात होऊन २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंध देशात हळहळ व्यक्त केली गेली. मात्र दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी पार्टी केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आता एअर इंडियाच्या विमानतळ सेवा व्यवस्थापन कंपनीने (AISATS) मोठी कारवाई केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी नाचगाणे करून जल्लोष केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
सिंगापूर स्टॅट्स लिमिटेडबरोबर ग्राउंड-हँडलिंग संयुक्त उपक्रम असलेल्या एअर इंडियाच्या AISATS या कंपनीचे कर्मचारी कार्यालयात पार्टी करताना एका व्हिडीओमध्ये दिसले. सदर व्हिडीओ नेमका कोणत्या तारखेचा आहे, यावर कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र १२ जूनच्या अपघातानंतर कार्यालयात पार्टी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.












