अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ४२ व्या तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांचं पथक आणि फॉरेन्सिक टीम पोहोचली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांना शेफालीच्या निधनाची बातमी मध्यरात्री १ वाजता ( २८ जून ) मिळाली. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
“अभिनेत्री मुंबईतील अंधेरी परिसरात राहत होती. तिचा पती व कुटुंबातील अन्य सदस्य तिला रात्री उशिरा रुग्णालयात घेऊन पोहोचले होते आणि त्यानंतर डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केले”, असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागीसह अन्य चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात दोन मदतनीस, सुरक्षा रक्षक यांचाही समावेश आहे.
शेफाली जरीवालाबद्दल सांगायचं झालं, तर तिचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. अभिनेत्रीने आजवर अनेक शो, चित्रपट तसेच गाण्यांच्या अल्बममध्ये काम केलेलं आहे. ‘नच बलिए’ कार्यक्रमात देखील शेफालीने सहभाग घेतला होता. तर ‘बिग बॉस १३’ मध्ये अभिनेत्री स्पर्धक म्हणून झळकली होती. २००४ मध्ये शेफालीचं पहिलं लग्न संगीतकार हरमीत सिंग याच्याशी झालं होतं. या दोघांचा २००९ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्रीने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं.












