अश्लील व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर विकल्याप्रकरणी एका दाम्पत्याला हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सनं अटक केली आहे. ४१ वर्षीय पती आणि त्याची ३७ वर्षीय पत्नी इंटरनेटवरील एका ॲपवर खासगी क्षणांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करत होते. लाईव्ह पाहण्यासाठी ते ॲपवरील युजर्सकडून दोन हजार रुपये घेत होते. तर अश्लील व्हिडीओंची क्लिप ५०० रुपयांत विकत होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयात शिकणाऱ्या आपल्या मुलींचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी सदरचे कृत्य केल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अटक केलेला पती टॅक्सी चालक आहे. तर त्याची पत्नी गृहिणी आहे. दोघांनीही पैशांसाठी सदर कृत्य केल्याचे मान्य केले. पोलिसांनी अटक करताना दाम्पत्याकडील कॅमेरा आणि इतर उपकरणे जप्त केली.
१७ जून रोजी या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलींना या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, दोन मुलींच्या महाविद्यालयाचा खर्च दाम्पत्याला झेपत नव्हता. मात्र मुली शिक्षणात हुशार असल्यामुळे त्यांना मुलींचे शिक्षणही पूर्ण करायचे होते. त्यामुळे दाम्पत्याने सोप्या मार्गाने पैसे मिळविण्यासाठी सदर पाऊल उचलले.












