बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. संजय लंडनमध्ये पोलो खेळत होते, तेव्हा त्यांच्या घशात मधमाशी अडकली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनानंतर निधनानंतर अनेकांनी दु:खद पोस्ट शेअर केल्या होत्या.
अशातच ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ फेम कल्याणी चावलाने दिवंगत संजय कपूर यांच्या आठवणीत लिहलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कल्याणी चावला म्हणते, “संजय आणि माझी मैत्री गेल्या तीन दशकांपासून आहे. मी त्याच्याशी अनेक आठवडे बोलले नव्हते. माझ्या व्यवसायात तो मला कायम मार्गदर्शन करायचा.”
यापुढे तिने म्हटलं, “मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल तो असहाय्य होता. आम्ही कायम एखाद्या भावंडांसारखं भांडायचो. त्याने माझ्या प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा दिला आहे. ताहिरावर त्याचे खूप प्रेम होते. तो एक चांगली व्यक्ती होता. आपण जे काही हाती घेतलं आहे, त्यात सर्वोत्तम देण्याचा त्याचा स्वभाव होता. मग ते पोलो खेळणं असो किंवा स्वत:च्या वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळणं असो.”
यापुढे कल्याणी चावला म्हणते, “संजयचे बुद्धिमान आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या प्रियाशी लग्न झालं होतं. प्रियाच्या प्रत्येक मताचा आणि तिने दिलेल्या सल्ल्याचा त्याच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. संजयच्या आयुष्यात प्रियाचं खूप मोठं स्थान होतं. तो प्रत्येक बाबतीत प्रियाचे नाव घेत असे. त्याच्यासाठी आयुष्यात कायमच पत्नी आणि मुलं महत्त्वाची होती. तो त्यांनाच अधिक प्राधान्य द्यायचा.”












