गेल्या काही दिवसांपासून इटलीच्या एका फॅशन शोची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. इटलीमध्ये झालेल्या या शोमध्ये Prada या सुप्रसिद्ध कंपनीचे मॉडेल कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक करताना दिसले. वरवर पाहता ही कौतुकाची बाब वाटत असली, तरी आता प्राडावर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरी केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे ही चप्पल एक लाख रुपयांना प्राडाकडून विकली जात आहे. त्यामुळे एकीकडे यावरून मोठी चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत बोलताना मिश्किल टिप्पणी केली आहे.
नेमका कोल्हापुरी चपलांचा वाद काय?
इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये Prada नं आपल्या ‘मेन स्प्रिंग समर २०२६ कलेक्शन’मधील वेशभूषा सादर केल्या. त्यात प्राडाचे मॉडेल चक्क कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्पवॉक करत होते. या चपलांची किंमत Prada कडून तब्बल एक लाख रुपये लावण्यात आली आहे. पण कोल्हापूरची ओळख मानली जाणारी कोल्हापुरी चप्पल प्राडानं थेट त्यांच्या कलेक्शनचा भाग म्हणून विदेशातील फॅशन शोमध्ये सादर केल्यामुळे त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.“जीआय टॅग (GI Tag) असलेल्या कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून विकताना किमान कोल्हापूरच्या कारागिरांना त्याचं श्रेय देण्याचं सौजन्य आणि ब्रॅन्डिंग करताना कोल्हापुरी चप्पल म्हणूनच ब्रॅन्डिंग करण्याचं भान जर या कंपनीला नसेल तर अशा चप्पलचोर कंपनीवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करायला हवी”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस
Prada वादावर शरद पवारांची भूमिका काय?
दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांना पत्रकार परिषदेत या वादासंदर्भात विचारणा करण्यात आली. तेव्हा शरद पवारांनी पेटंटचा मुद्दा उपस्थित केला. “इटलीत जे घडलं ते चुकीचं आहे. त्यांच्यासाठी पेटंट घेणं आणि उत्तर देणं हा मार्ग आहे. पेटंट घेतलं पाहिजे. पेटंट घेतलं तर काम करता येईल. नाहीतर काहीही करता येणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीकात्मक पोस्ट केली आहे.
उल्हासनगरचा उल्लेख आणि शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
यावेळी बोलताना शरद पवारांनी उल्हासनगर येथील मार्केटचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. “आपल्याकडे उल्हासनगर नावाचं गाव आहे. तिथे अमेरिकन छापाच्या गोष्टी तयार होतात. तिथे वस्तूंवर लिहिलेलं असतं ‘मेड इन यूएसए’. आणि विचारलं यूएसए म्हणजे काय तर सांगतात उल्हासनगर सिंधी असोसिएशन”, असं विधान शरद पवारांनी यावेळी केलं.












