नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात २५ जून च्या संध्याकाळ पासून सुरु झालेल्या पावसाचा फटका समृद्धी महामार्गालाही बसला. मेहकर जवळून जाणाऱ्या समृद्धीच्या पुलाखाली राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने व रस्त्यावरून नदी सारखा प्रवाह वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेबाबत समृद्धी महामार्ग प्रशासनाने महत्वाची माहिती दिली आहे.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गचे (समृद्धी महामार्ग) अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक, शिबीर कार्यालय अमरावती यांनी या घटनेबाबत स्पष्टिकरण दिले आहे. त्यानुसार समृद्धीवरील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे पाणी साचलेबाबतची सद्यस्थिती पुढे आली आहे. त्यानुसार समृध्दी महामार्ग व खामगाव कडून मेहकरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी, समृध्दी महामार्गास मेहकर इंटरचेंज येथे मिळतो.
राष्ट्रीय महामार्ग हा समृध्दी महामार्गाच्या खालून जातो. समृध्दी महामार्ग हा वरच्या भागास आहे. २५ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजतापासून २६ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजतापर्यंत येथे सतत पाऊस पडून अतिवृष्टी झाली. या काळात येथे साधारणत: १०७ मीमी (अंदाजे) पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे खामगावकडून मेहकरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरची साधारणतः २०० मीटर लांबी १ ते दीड तास पाण्याखाली होती.












