जिमाका, वाशीम (दि.२३,जून): वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात नव्याने शासनाच्या ताब्यात आलेल्या रिठद प्राथमिक आरोग्य केंद्रासंदर्भात ‘लोकशाही न्यूज’ व ‘टू द पॉईंट’ या युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात आलेल्या बातमीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने सदर आरोग्य केंद्राची पाहणी करून तपासणी केली.
तपासणीदरम्यान, एप्रिल महिन्यापासून विना मोबदला रखवाली करत असलेले श्री. निलेश प्रल्हाद गवई यांच्याकडे घरगुती वापरासाठी आणलेली सुकी मासळी आढळून आली. मात्र, सविस्तर चौकशीअंती हे स्पष्ट झाले की, सदर परिसरातून कोणत्याही प्रकारे मासळी विक्रीचा व्यवसाय केला जात नाही. गावातील प्रतिष्ठित व सामान्य नागरिकांनीदेखील ही बाब दुजोऱ्याने स्पष्ट केली आहे.
दरम्यान, शासनाने मार्च महिन्यात हे आरोग्य केंद्र ताब्यात घेतले असले तरी, अद्याप मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने चार महिन्यांनंतरही दवाखाना सुरु न झाल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांनी एकमुखाने लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी व इतर पदांची भरती करून दवाखाना कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “रिठद प्रा.आ. केंद्र मार्चमध्ये ताब्यात घेतल्यानंतर एप्रिलपासून आवश्यक असलेल्या १५ पदांपैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती तदर्थ, बंधपत्रित किंवा नियमित पद्धतीने केली जाणार आहे. उर्वरित १३ पदांसाठी आउटसोर्सिंगद्वारे भरती प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला असून, तो पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.”
सदर प्रकरणी मासळी विक्रीचा आरोप निराधार ठरवण्यात आला असून, गावकऱ्यांची वैद्यकीय सुविधांबाबतची मागणी शासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












