नाशिक – शहराप्रमाणे ग्रामीण भागातही मोकाट जनावरांनी दहशत पसरवली असून कळवणमध्ये मोकाट गाईंच्या हल्ल्यात ८५ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून त्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक जण जखमी झाले आहेत. संबंधित जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावेत, कोंडवाडा उभारून या त्रासातून सुटका करण्याची मागणी नागरिकांसह राजकीय पक्षांकडून होत आहे.
कळवणच्या शिवाजीनगर भागातील जुना ओतूर रस्त्यावर ही घटना घडली. गाईंच्या हल्ल्यात भालचंद्र मालपुरे (८५) यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या आबा मोरे यांच्यावरही गाईंनी हल्ला केला. ते जखमी झाले. मालपुरे हे दुचाकीवर मागे बसून जात होते. कळवण मर्चंट्स सहकारी बँकेसमोर दुचाकी थांबली असता त्याठिकाणी असलेल्या दोन गाईंनी मालपुरे यांना धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले. ते सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच गाईंनी त्यांना पायदळी तुडवले.












