नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणार नसल्याचे घोषित केले होते. परंतु, आता मार्च-२०२६ पर्यंत हे मीटर सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडे लागतील, असे खुद्द महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
महावितरणने काही वर्षांपूर्वी राज्यात सर्वत्र स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा केली होती. त्यासाठीचे कंत्राटही अदानी व इतर खासगी कंपन्यांना दिले होते. परंतु, या निर्णयाला कडाडून विरोध झाला. वाढता विरोध बघता तत्कालीन ऊर्जामंत्री फडणवीस यांनी हे मीटर सामान्य ग्राहकांकडे लागणार नाहीत, असे विधानसभेत घोषित केले. तेच फडणवीस आता स्वत: मुख्यमंत्री असून त्यांच्याच काळात स्मार्ट मीटर लावण्याचा वेग वाढवण्यात आला आहे.












