पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पवित्र यात्रा आहे. लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी पायी चालत ही यात्रा करतात. विठुनामाचा गजर करत अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने मैलमैल चालत असतात. वारीला निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाला पाहण्याची ओढ लागलेली असते. वारीचा हा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी अनेक वारकरी वारीत सहभागी होत असतात.
सामान्य वारकऱ्यांबरोबरच अनेक कलाकार मंडळींनाही या सोहळ्यात सहभागी होण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार या वारीत सहभागी होत असतात. सायली संजीव, आलापिनी, सायली पाटील, आदेश बांदेकर, अमित भानुशाली यांसह अनेक कलाकार यंदाच्या पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली आहेत. अशातच आता यात आणखी एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने यंदाच्या वारीत सहभाग घेतला आहे आणि या वारीत सहभागी झाल्याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या वारीत तिने केवळ सहभाग नाही घेतला, तर वारकऱ्यांची मनोभावे सेवाही केली आहे. अभिनेत्रीची ही कृती सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
कश्मिराने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती काही महिला वारकऱ्यांच्या पायांची तेल लावून मालिश करतानाचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान ती वारकऱ्यांशी प्रेमाने संवादही साधत आहे. तसंच कश्मिरा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये अभिनेत्री पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना खाऊवाटप करताना दिसत आहे. वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूचे वाटप करत तिने सेवा केली आहे.
पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायांची मालिश तसंच खाऊवाटप या या सर्व गोष्टी ती शुचिकृत्य फाउंडेशन अंतर्गत करत आहे. अभिनेत्रीने तिचा हा खास व्हिडीओ शेअर करत “विठ्ठलाच्या पायी झाले भाग्यवंत…शुचिकृत्य फाउंडेशन द्वारा वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न” असं म्हटलं आहे. मालिकेत अभिनेत्री खलनायिका साकारत आसली तरी तिची ही कृती सध्या अनेकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.












