मुंबई : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही सोमवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, पुढील काही तासांत मुंबईसह कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात संततधार पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरला होता. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. सोमवारी सायंकाळनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. काही भागात सोमवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. आज पहाटेही पावसाचा जोर कायम होता. दादर, वरळी, परळ, प्रभादेवी, भायखळा तसेच ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मध्यरात्री पावसाचा जोर होता. दरम्यान, मुंबईत पावसाचा जोर काही तासांत आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे. कमी दृष्यमानता, वेगवान वारे, मुसळधार सरींच्या शक्यतेमुळे घाट क्षेत्रांतून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे वाहतूक उशिराने
मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे रेल्वे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे १० ते ३५ मिनिटे, पश्चिम रेल्वे ३ ते ५ मिनिटे आणि हार्बर मार्गावरील रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे.












