इस्कॉनचे साधू गौरांग दास यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या भेटीचा एक मनोरंजक किस्सा लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितला आहे. गौरांग दास यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बे येथून बीटेक पदवी घेतलेली आहे. मात्र, असं असलं तरी देखील गौरांग दास यांनी अध्यात्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेत ते इस्कॉनचे साधू बनले आहेत.
गौरांग दास यांनी इंडिया ग्लोबल फोरम २०२५ या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे त्यांच्याच वयाचे आहेत. सुंदर पिचाई यांनी गौरांग दास यांच्या तरुण दिसण्यावरून त्यांचं कौतुक केल्याचं गौरांग दास यांनी सांगितलं आहे. तसेच माणसांमध्ये तणाव आणि एकाकीपणाची भावना वाढण्यामागची कारणंही त्यांनी सांगितली. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
गौरांग दास यांनी लंडनमध्ये बोलताना खुलासा केला की त्यांनी पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर ते जेव्हा सुंदर पिचाई यांना भेटले तेव्हा त्यांनी गौरांग दास यांच्या लूकचं कौतुक केलं होतं. गौरांग दास म्हणाले की, “मी सुंदर पिचाई यांच्याच बॅचमध्ये आयआयटीमध्ये गेलो होतो. काही वर्षांनंतर आम्ही भेटलो. तेव्हा सुंदर पिचाई म्हणाले की, तू माझ्यापेक्षा तरुण दिसतोस. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, तुम्ही गुगलशी व्यवहार करता, ज्यामुळे तणाव निर्माण होत असेल.”
दरम्यान, यावेळी गौरांग दास यांनी डिजिटल व्यसन, एकटेपणा आणि चिंता आणि सोशल मीडियासंदर्भात देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, “आपल्यासमोर एक मोठी समस्या आहे. जगभरात २३ कोटी लोकांना सोशल मीडियाचं व्यसन आहे. एकट्या भारतात ७० टक्के किशोरवयीन मुलं दररोज सात तास ऑनलाईन वेळ घालवतात. जगभरातील सातपैकी एक व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे”, असंही गौरांग दास यांनी म्हटलं आहे.
गौरांग दास कोण आहेत?
गौरांग दास ज्यांना गौरांग प्रभू (एएसके आनंद) म्हणून देखील ओळखलं जातं. ते एक इस्कॉनमध्ये (इंटरनॅशनल सोसायटीमध्ये फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) साधू आहेत. दास यांनी स्वतःला आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात पूर्णपणे समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे काही पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहेत.












