“महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद विसरून जाईन”, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांना प्रतिसाद दिला आहे. पाठोपाठ मनसे व शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकर्ते आणि स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसू लागले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. असं असताना या दोन्ही भावांमधील बहुचर्चित युती अद्यापही अनिश्चित आहे. राज आणि उद्धव ठाकरे दोघेही युतीच्या शक्यतांबाबत वक्तव्ये करत असले तरी दोघांनीही अद्याप युतीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दुसऱ्या बाजूला, शिवसेना (ठाकरे) व मनसेचे नेते, कार्यकर्ते युतीबाबत अनुकूलता दर्शवत आहेत. अशातच ही युती होण्याआधीच त्यात मिठाचा खडा पडल्याचं दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर (ठाकरे) टीका करणारी एक पोस्ट केली असून या पोस्टची सध्या बरीच चर्चा होत आहे. या पोस्टद्वारे देशपांडे यांनी शिवसेनेबद्दलची (ठाकरे) त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली आहे. हे करत असताना त्यांनी जुन्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. ‘केम छो वरली’, ‘जलेबी फाफडा’, ‘करोना काळातील मनसे कार्याकर्त्यांवरील खटले’, अशा सर्वच गोष्टींची त्यांनी उजळणी केली आहे.












