इराण-इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी संघर्षात उडी घेत अमेरिकेने काल इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले केले होते. यानंतर इराणने अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले होते. आता सीरियाच्या हसकाह प्रांतातील एका अमेरिकन लष्करी तळावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांच्या काही तासांनंतर अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे. इराण सरकारशी संलग्न असलेल्या मेहर वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.
हा हल्ला इराण समर्थित प्रॉक्सी मिलिशियाने केल्याचा संशय आहे. इराणने यापूर्वी इशारा दिला होता की, जर अमेरिकेने लष्करी कारवाई तीव्र केली, तर या प्रदेशातील अमेरिकन तळ त्यांच्या हल्ल्यांचे लक्ष्य ठरतील.












