काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले असून, त्यांच्याकडे असलेली ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि संवाद साधण्याचे कौशल्य यामुळे ते जागतिक स्तरावर भारतासाठी अनमोल व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. शशी थरूर यांनी द हिंदू या इंग्रजी दैनिकातील एका लेखात पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.
या लेखात शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींना आणखी सहकार्य करण्याबाबत आणि पाठिंबा देण्याबाबतही भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच शशी थरूर यांनी भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळासह अमेरिका व इतर अनेक देशांचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका जगासमोर मांडली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस सातत्याने मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी मोदींचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
खासदार शशी थरूर यांनी द हिंदू या इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, “ऑपरेशन सिंदूर नंतरचा राजनैतिक संपर्क हा राष्ट्रीय संकल्प आणि प्रभावी संवादाचा एक मार्ग होता.” ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि संवाद साधण्याचे कौशल्य यामुळे ते जागतिक स्तरावर भारतासाठी अनमोल व्यक्ती आहेत, परंतु त्यांना अधिक पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.”
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर याबाबतची भूमिका शशी थरूर यांनी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळासह जगासमोर मांडली होती.
या लेखात थरूर यांनी लिहिले आहे की, “ऑपरेशन सिंदूर नंतर झालेला राजनैतिक संपर्क हा राष्ट्रीय दृढनिश्चय आणि प्रभावी संवादाचा मार्ग होता. यामुळे, जेव्हा भारत एकजूट होतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्टतेने आणि दृढनिश्चयाने आपला आवाज उठवू शकतो, हे स्पष्ट झाले.”












