मुंबई : खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केट मधील गुंतवणूक भलतीच महागात पडली आहे. आरोपींनी त्यांची सुमारे सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली. याप्रकरणी मध्य सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास करत आहेत. फसवणूकीची रक्कम जमा झालेल्या बँक खात्यांच्या मदतीने पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार ८३ वर्षाचे वयोवृद्ध असून ते दादर परिसरात राहतात. ते एका नामांकित कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. तक्रारीनुसार, १० मार्च रोजी समाज माध्यमांवर प्रसिद्ध कंपनीच्या स्टॉक एक्स्चेंजची जाहिरात बघितली. त्यावर क्लिक करताच ग्रुपमध्ये जोडले गेले. त्यामध्ये एकूण ९२ ग्रुप सदस्य होते. ग्रुपवर अश्विन पारेख नावाची व्यक्ती संदेश पाठवत होती. त्यांना २ मे रोजी विनिता पाटोडिया नावाच्या एका महिलेने संपर्क साधून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्याची इच्छा आहे का याबाबत विचारले होते. त्यावेळी शेअर मार्केटमध्ये होणारा नफा बघून त्यांनीही गुंतवणुक करण्याचे ठरवले व त्या महिलेला गुंतवणूकीसाठी होकार दिला.
त्यानंतर महिलेने तक्रारदाराची नोंद केली. त्यांनी या कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत होता. त्यामुळे त्यांनी आणखी काही शेअर्समध्ये गुंतवणूक केली. २ मे ते २८ मे दरम्यान १ कोटी १९ लाख रुपये गुंतवले. त्याबदल्यात त्यांना खात्यात १५ कोटी रुपयांचा नफा दिसत होता. त्यांनी ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना रक्कम काढता आली नाही.
त्याबाबत त्यांनी विचारणा केली असता त्यांना महिलेने दहा टक्के कमिशन रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा होताच त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे सांगितले. मात्र दहा टक्के कमिशन रक्कम भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्याकडील सर्व रक्कम शेअरमध्ये गुंतवली होती. त्यांनी पैसे मिळाल्यानंतर कमिशन भरण्याची मुभा मागितली.












