‘छावा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटातील विकी कौशल, अक्षय खन्ना या कलाकारांच्या कामाचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं. पण, तरीही या चित्रपटाबद्दल काहींच्या संमिश्र प्रतिक्रियाही होत्या. अशातच या चित्रपटातील अभिनेत्री डायना पेंटीने याबद्दल तिचं मत मांडलं आहे. तसेच तिनं ‘छावा’मधील तिच्या भूमिकेबद्दलही सांगितलं आहे. डायनाने ‘छावा’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटात डायना पेंटीनं औरंगजेबाच्या मुलीची झीनतची भूमिका साकारली होती. ‘छावा’बद्दल बोलताना डायना म्हणाली, “प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया असतात. काहींना चित्रपट आवडतो, काहींना आवडत नाही. मी चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतेय म्हणून मला तो आवडलाच असेल, असं काही नसतं. पण याचा अर्थ असाही होत नाही की, तो चित्रपट चांगला नसेल”.












