वसई: वसई-विरार महापालिकेने नवघर अंबाडी येथील जलतरण तलावाची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.त्यामुळे हे जलतरण तलाव सुरू होण्यास आणखीन विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसई विरार महानगरपालिकेने जलतरणपटू आणि शहरातील नागरिकांसाठी पोहण्यासाठी नवघर येथे जलतरण तलाव तयार केले आहे. या तरणतलावात पोहण्यासाठी सुमारे एक हजार सदस्यांनी सभासदत्व घेतलेले आहे. या तरणतलावात अनेक नागरीक नियमितपणे पोहायला येत असतात. मात्र तरणतलावाची दुरावस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
या दुरुस्तीच्या कामामुळे सद्यस्थितीत हा तरण तलाव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे या कामासाठी महापालिकेने १ कोटी ४४ लाख रुपयांच्या निधीचे नियोजन केले असून २७ मार्च २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला. कामाची मुदत ९ महिन्याची आहे. या तरणतलावात शेड उभारणे, तरणतलाव तयार करणे, जलशुद्धीकरण प्रकल्प बसविणे, अंतर्गत दुरुस्ती व सोयीसुविधा अशा कामाचा समावेश आहे.












